बॅनर सिटी रत्नागिरी (भाग०१)*
अमित सामंत.
*स्वच्छ सुंदर रत्नागिरी... बॅनर लावा दारोदारी!!*
रत्नागिरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत!!
ग्लोबल जगाचा हात धरून धावणाऱ्या या शहराची *'मँगो सिटी'* *'पर्यटन केंद्र'* ही अनावश्यक ओळख पुसून टाकण्यात शेवटी प्रशासन यशस्वी झालं आहे. आता बॅनर सिटी ही नवी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
*रत्नागिरीत आल्यावर काय पहाल???*
इतिहास, समुद्र, गड, राजवाडे तुम्ही नेहमी पहाता, रत्नागिरीत तुम्हाला सगळ्या प्रकारचे, आकाराचे, रंगांचे, राजकीय पक्षांचे, जातीचे, धर्माचे, खेळाचे, अभिनंदनाचे आणि खूssप विविध प्रकारचे बॅनर्स सर्वत्र बघायला मिळतील. *दुभाजकांपासून नगरपरिषदेपर्यंत आणि किल्ल्यापासून गल्ल्यापर्यंत* तुम्हाला कुठेही आणि कितीही बॅनर्स पाहायला मिळतील ते फक्त आणि फक्त रत्नागिरीतच!!!
*भाऊंचे, दादांचे, साहेबांचे, निवडणुकीत जिंकलेल्या, भविष्यात जिंकणाऱ्याचे आणि आयुष्यात कधीही न जिंकलेल्या उमेदवारांचे, बारशाचे- बाराव्याचे, कुस्तीचे आणि मस्तीचे, मावशीच्या म्हशीच्या नातवाच्या वाढदिवसाचे* बॅनर्स पहायचे असतील तर रत्नागिरीला पर्याय नाही.
*रत्नागिरी कुठे आहे??*
*असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे कारण बहुतेक सर्व 'सरकारमान्य' जाहिरातींचे बॅनर्स *आपल्या बोलीभाषेत म्हणजे इंग्रजीत* असल्याने रत्नागिरी महाराष्ट्रात आहे का? असा *वाघाच्या आवाजात प्रश्न विचारण्याची हिम्मत इथं कुणी करणार नाही, कारण प्रशासनासह रत्नागिरीत सगळीकडे वाघच वाघ आहेत.*
पर्यटकांनो!!
या...नवं नवे बॅनर्स बघायला फक्त रत्नागिरीत या!!
*रहिवाशांना सूचना:*
*बॅनर्स तुम्हाला त्रास देत असतील, तुम्हाला सिग्नल नीट दिसत नसेल, शहर बकाल वाटत असेल तर... तर काय?? डोकं शांत ठेवा आणि खालील स्लोगन 11 ग्रुप्सना पाठवा*
*स्वच्छ सुंदर रत्नागिरी... बॅनर लावा दारोदारी!!*
No comments:
Post a Comment