Pages

Thursday, 11 October 2018

मी टू: 'आपले' आणि 'त्यांचे'

मी टू : 'आपले' आणि 'त्यांचे'

गेले दोन दिवस सोशल मीडियावर 'मी टू' चळवळीची खिल्ली उडवणारे, विशेषतः स्त्रियांना अपमानकारक ठरतील असे अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. दुर्दैवाने अनेक सुशिक्षित स्त्रियाही असे मेसेज बिनदिक्कत पुढे पाठवित आहेत. त्या निमित्ताने या चळवळीचा परामर्ष घेणारा हा लघुलेख..

भारतात सुदैवानं (की दुर्दैवानं) नवरात्रीच्या दिवसात (ज्या वेळी स्त्रीला आदिशक्ती मानून पूजल जातं) ही चळवळ उभी राहिलीय. भारतासारख्या देशात या चळवळीला जनाधार मिळणं कठीण आहेच, अर्थात आरोप झालेलं पुरुष यात दोषी आहेत आणि आरोप करणाऱ्या अबला वगैरे आहेत इतकी भाबडी समजूत करून हा लेख लिहिलेला नाही. कोण दोषी आहे हे ठरवणं सोपं असणारच नाही, आणि सध्याची स्थिती बघता निर्णयही लागेल असं दिसत नाही. मात्र किमान कुणीतरी अभिनेत्री /लेखिका जी शो बिझनेस मधून स्वतःच करिअर पणाला लावत हे धाडस करतेय, कुणीतरी गायिका, कुणीतरी राजकीय नेत्याच्या बळजबरीला बळी पडलेली आज आवाज तर उठवतेय हे ही नसे थोडके!! ( मागे 1990 च्या दशकात एक प्रसिद्ध संगीतकारावर एक प्रख्यात गायिकेने बलात्काराचा आरोप करून स्वतःच करिअर संपवून घेतलं होतं, एक प्रख्यात मराठी 'उपऱ्या' लेखकावर अनेक स्त्रियांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते)
आजही समाज आपल्यालाच दोषी ठरवेल या भीतीने अनेक स्त्रिया शोषण सहन करतात, वेळेला जीवन संपवितात आपल्या पती/घरच्यांशी यावर बोलण्याची त्यांची हिम्मत नाही किंवा इतक्या विश्वासाचा जवळचा कुणी वाटत नाही!!

मी टू काय आहे ???
अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलनो (Alyssa Milano) हिने 2017 साली एक खळबळजनक ट्विट केलं!!! यामध्ये हॉलीवूड मीडिया जायंट हार्वे वेइन्स्टिन ( Harvey Weinstein) वर लैंगिक छळ केल्याचा जगजाहीर आरोप केला. हार्वे वर आरोप करणं म्हणजे मिडियातील आपलं करिअर संपविणे याची चांगली जाण एलिसाला असावी तरीही तिने न डगमगता हे पाऊल उचललं!! धाडसी माणसाच्या पाठी दैव असतं तसंच काहीसं एलिसाच्या बाबत घडलं, तिच्या ट्विट वरून असंख्य स्त्रियांनी आपणालाही हार्वे वेइन्स्टाईनचा 'असाच' अनुभव आल्याचं मान्य केलं!! ही चळवळ इतक्यावर थांबली नाही.. काडीचा वणवा झाला आणि केवळ 24 तासातच 500000 लोकांनी आपणही 'कधीतरी' ' कोणाकडूनतरी' अशा अनुभवाला सामोर गेल्याची ठसठसणारी वेदना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली. अनेक मातब्बर अडचणीत आले.
सोशल मीडिया मुळे ही चळवळ जगभर पोहोचली. पण तत्पूर्वी 2006 साली तराना बुर्क (Tarana Burke) या कृष्णवर्णीय स्त्रीने ( जी रूढार्थाने अजिबात सुंदर नाही) ही चळवळ सूरु केली होती (जिला सोशल मिडियाचं वलय तेव्हा लाभलं नाही) त्याला कारणही तितकंच हृदयद्रावक होतं एक 13 वर्षाच्या बालिकेनं तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं तरानाला सांगितलं मात्र हतबल तराना तिला मदत करू शकली नाही, फक्त मी सुद्धा तुझ्यासारखं दुःख भोगलय (MEE TOO) इतकंच त्या अबोध बालिकेला सांगू शकली. मात्र यातून धडा घेऊन तरानानं लैंगिक छळावणुकी विरोधी लढा उभा केला हाच लढा म्हणजे मी टू!!!
पाश्चात्य देशात मी टू ला विरोध झाला.....पण ना तरानाची तिच्या रंग रुपावरून खिल्ली उडवली गेली ना आरोपकर्त्याना ते किती समाजसेवा करतात, कित्ती चांगले आहेत नै!! असं पाठीशी घातलं गेलं!!!

भारतीय मी टू चा निकाल काहीही लागेना पण त्यानिमित्ताने स्त्रियांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः पुढाकार घेण्याचं धाडसी पाऊल उचललं तरी भरून पावेल!! अनेक पुरुष लैंगिक गुन्हे करण्याआधी किमान विचार करतील. पोलिसांपेक्षाही सोशल मिडियाला घाबरून काही प्रमाणात लैंगिक छळावणुक कमी होऊ शकेल अशी आशा बाळगायला हरकत नाही
बाकी चोर कोण आणी साव कोण हे काळच (आणि न्यायालय) ठरवेल!!!

(आकडेवारी विकिपीडिया साभार, अमेरिकन उच्चार यु ट्यूब वरून साभार)

अमित सामंत

No comments:

Post a Comment