"पैले मैं जिसम का धंदा करती थी"......
असं वाक्य एखाद्या स्त्रीच्या तोंडून मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं होतं.
नुकताच विशीत येण्याचा माझा तो काळ, जग बदलायचं अशी भाबडी स्वप्न असलेला, पुस्तकातील नियम, सिनेमातले लोक आणि खरंखुरं जग यात प्रचंड फरक असतो हे डोक्यात पुरतं घुसलं नव्हतं तेव्हाचा काळ !!
******@******
"भैय्या, जरा मदत हुना थी", ...,एक बुरखा घातलेली बाई चाचरत माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती.
'" बोलो" मी ...
" वो क्या तभी गोरमेन्ट (सरकार) स्कीम निकाले, उसमे लड़कियोंको मोफत सिलाई सिखाते, उसका फॉरम भरनेका था" हातातला चुरगळलेला फॉर्म पुढे करत तोच अजिजीचा स्वर!!
मग तिचं येणं जवळपास रोजचचं झालं.
तीच अजिजी, तीच तळमळ!!
संबंधित ऑफिस आणि अधिकारी यांच्या भेटी घ्यायच्या, त्यांनी चक्क दुर्लक्ष करायच, रोज नवनवी कागदपत्र आणायला सांगायची हे सगळं सरकारी चक्र सुरु झालं. माझी खाजगी नोकरी.. पगार आणि वेळ दोन्हीही अपुरे, पण तिचं हाता पाया पडणं नको व्हायचं आणि मी अनेकदा मनात नसताना तिच्यासोबत चालायला लागायचो. या काळात तहसीलदार कचेरी जवळचे रिक्षावाले सतत तिला बघून काहीतरी कमेंट करतायत असं वाटत होतं. खरं सांगायचं तर मलाही असं रोज तिच्याबरोबर जाणं ऑड वाटायचं पण संवेदनशीलता आणि संघर्ष या दोन गोष्टी जन्मजात मिळाल्यान ते जाणंही आपोआप व्हायचं!
******@*******
या सर्वात तिचा बुरखा मला जास्त खुपायचा!! धर्म म्हणून नव्हे, पण आपली ओळख अशी लपवायला, बिनचेहऱ्याचं जगायला या स्त्रियांना काही कसे वाटत नाही?? या विचाराने!! पण अनेकदा तिला सांगूनही ती त्यावर काही बोलायची मात्र नाही.शेवटी एकदाचे हो ना करत तिच्या 14/15 वर्षाच्या मुलीला कोर्सला ऍडमिशन मिळाली आणि एका संस्थेकडून शिलाई मशीन साठी मदतही मिळाली.
*******@*******
ती संध्याकाळ माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार होती... निर्विवाद!!एस टी स्टँड च्या त्या कोपऱ्यात मला आयुष्याचं एक वेगळं रूप बघायला मिळणार होतं. बुंदीच्या लाडवांची पुडी घेऊन तिच बुरखेवाली परत माझ्यासमोर हजर, मी म्हणणारा पाऊस, माझी घरी जाण्याची गडबड.. कामाचा ताण आणि त्यात ही...
" भोत तकलिफ दी तुमको साब, माफ करो, तुमको मेरा बुर्का अच्छा नय लगता ना साब पर ये बुर्का है इसके वास्तेच मै हौ"
पुढे तीन सांगितलेली कहाणी हदरवणारी होती.. ती... कुलसुमबी, नाव तीचं.. एका मजूर कुटुंबात जन्मली एकूण 8 भावंडातली सहावी!!! कुठल्यातरी स्टेशन वर दहा बारा वर्षाची असताना चुकली किंवा जन्मदात्यांनी सोडून दिली, भीक मागत, मजुरी करत गावोगाव फिरली, अनेकांनी शरीराचे लचके तोडले, कुणा बांधकाम मजुराशी लग्न केलं तीन मुलं जन्माला घातली, जरा बरे दिवस येतात तोवर नवरा बिल्डिंगवरून पडला, संपला... तो आणि तिचा संसारही!! मुलगा व्यसनी निघाला, एक मुलगा तापानं गेला, एक मुलगी...आस्मा, तिच्यावर कुलसुमबीचा फार जीव!! मुलगा कुठंतरी पोलीस केस मध्ये अडकला मग त्याला सोडविण्यासाठो हिला शरीर विकावं लागलं, मुलगा सुटला पण पोलीस वेळी अवेळी ' टाईम पास' साठी बोलवत!! तिथून सोडून पुन्हा नव्या जागी आली परत मजुरी सुरु.. काही 'गिऱ्हाईक' ओळ्खतं आणि बोलवतं, मग ही बुरखा घालायला लागली..
******@********
" कूच बी होने देव साब मेरे आस्मा को मेरे जैसी जिंदगी नही दूँगी!" एवढं बोलून ती तरातरा निघून गेली.
माझ्या मनातले सगळे बुरखे टराटरा फाटत गेले.
No comments:
Post a Comment